क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण – मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. १७ : राज्यातील उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी आणि प्राध्यापकांच्या क्षमतेत गुणात्मकवाढ करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्यावतीने ‘क्वांटम संगणन उपक्रम’  राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील ५०० हून अधिक प्राध्यापकांना क्वांटम तंत्रज्ञानासंदर्भातील विशेष प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी दिली.

आज मंत्रालयात मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, उपसचिव संतोष खोरगडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, ‘मित्र’ संस्थेचे मुख्य कार्यकारीअधिकारी प्रवीण परदेशी, क्वांटम तंत्रज्ञान कक्षाचे प्रमुख डॉ. जे. बी. व्ही. रेड्डी (दूरदृश्य प्रणालीद्वारे), आय-हब क्वांटम तंत्रज्ञान फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुंज टंडन, प्रकल्प संचालक आणि पुणे येथील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेचे प्राध्यापक प्रा.सुनील नायर, मित्राच्या शिक्षण सेलचे वरिष्ठ सल्लागार पूजा मिसाळ तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या प्रभावी अंमलबजावणीसह विकसित भारत २०४७ च्या दृष्टीने दर्जात्मक उच्च शिक्षणाची तयारी सुरू आहे. या उपक्रमातून केवळ तांत्रिक ज्ञान नव्हे तर नवयुगातील अध्यापन कौशल्येही विकसित केली जातील. प्राध्यापक प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत अधिक दर्जेदार आणि आधुनिक शिक्षण पोहोचवले जाईल. राज्यातील विविध विद्यापीठांतील व तांत्रिक महाविद्यालयांतील ५०० पेक्षा अधिक प्राध्यापकांना प्रशिक्षण आणि क्वांटम संगणन, संशोधन, नावीन्यपूर्णता व कौशल्य विकासावर भर दिला जाणार आहे .

आय-हब क्वांटम तंत्रज्ञान फाउंडेशन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा असून, तो तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्राला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असेही मंत्री पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

०००

काशीबाई थोरात/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *