पूल, साकवांच्या सद्यस्थितीचा पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून आढावा

सिंधुदुर्गनगरी दि. १६ (जिमाका): पावसाळी परिस्थिती लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुल आणि साकवांच्या सद्यस्थितीबाबतचा आढावा पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतला. जिल्ह्यातील धोकादायक साकव तसेच पूल नागरिकांच्या वापरासाठी तात्काळ बंद करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी जिल्हा परिषद प्रशासनाला दिले. नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी साकवांच्या शेजारी साकव नादुरुस्त असल्याचा फलक लावा जेणेकरुन दुर्घटना होणार नाही. अनुचित प्रकार टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी गांभीर्यपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी नवीन पुल बांधण्यात आलेला आहे अशा ठिकाणचे साकव वापरासाठी पुर्णपणे बंद करा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

राष्ट्रीय महामार्गाबाबत निर्देश देताना ते म्हणाले की, पावसामुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची तात्काळ दुरूस्ती करा. रस्ते दुरुस्तीचे काम दर्जेदार झाले पाहिजेत. जेणेकरुन वारंवार ही समस्या निर्माण होणार नाही. हे काम आगामी काळात सणासुदीचे दिवस लक्षात घेता प्रवासामध्ये नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले.

यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता श्री. शेलार, कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, श्रीमती पवार, श्री. सावंत आदी उपस्थित होते.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *